सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यातील शिरजदा-खैरी परिसरात महसूल विभागाने आज (दि. १ ऑगस्ट २०२५) अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई केली. भरदिवसा रस्त्याच्या मध्यभागी विनापरवाना वाळू भरून नेत असलेला ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांनी थांबवून थेट तहसील कार्यालयात जप्त केला. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
दर्यापूर तालुक्यात वाळू घाटाचा लिलाव अद्याप न झाल्यामुळे कुणालाही वाळू उत्खनन अथवा वाहतुकीची अधिकृत परवानगी नाही. मात्र, काही मंडळी याची पूर्णतः पायमल्ली करत भरदिवसा अवैध वाळूची ने-आण करत आहेत. महसूल दिनीच महसूल विभागाने अशाच एका ट्रॅक्टरवर छापा टाकून वाळू तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.
या कारवाईबाबत अधिक माहिती अशी की, तलाठी शैलेश चक्रनारायण यांना गुप्त माहिती मिळाली की शिरजदा-खैरी मार्गावरून एक ट्रॅक्टर ट्रॉली भरलेली वाळू घेऊन जात आहे. त्यांनी ही माहिती तहसीलदार मा. रवींद्र कानडजे व पोलिस प्रशासनाला दिली. तत्काळ पथक घटनास्थळी दाखल झाले आणि ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये एक बास रेती आढळून आली. कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याने ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणण्यात आला आहे.
ही कारवाई तहसीलदार रवींद्र कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एस.पी. चक्रनारायण, ए.व्ही. दळू, एम.पी. डोरले, विश्वनाथ गोंडाणे व तलाठी गीते यांनी संयुक्तपणे केली. सदर ट्रॅक्टरच्या मालकावर महसूल कायद्यानुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
महसूल विभागाच्या या अचानक केलेल्या कारवाईमुळे दर्यापूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने घेतलेली ही धडक भूमिका जनतेत समाधान व्यक्त करत असून, अशा प्रकारचे उत्खनन रोखण्यासाठी अधिक तीव्र कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
