वाशिम/शिरपूर जैन (प्रतिनिधी – पंढरीनाथ पाटील), ६ ऑगस्ट २०२५ –
श्रावण महिन्यातील पावसाळी वातावरणामुळे साप दिसण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा संवेदनशील काळात शिरपूर जैन येथील सर्पमित्र अनिल साखरे यांनी आपल्या निसर्गप्रेमी आणि धाडसी भूमिकेमुळे परिसरात मानवतेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी केवळ एका दिवसात दोन सापांना सुरक्षित ठिकाणी सोडून देत त्यांचे प्राण वाचवले.
शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ तीर्थक्षेत्र पारस बाग परिसरात पाणदिवड जातीचा साप दिसून आला होता. घाबरलेल्या नागरिकांनी तातडीने सर्पमित्र अनिल साखरे यांना संपर्क केला. त्यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेत, सापाला सुखरूपरीत्या पकडले आणि जंगल परिसरात वनाधिकारी एस. टी. काळे आणि वनरक्षक शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सोडून दिले.
दुपारी साडेचारच्या सुमारास पांगरखेडा गावातील गजानन धबडधाव यांच्या घरात धामण जातीचा अजून एक साप आढळून आला. या घटनेबाबतही अनिल साखरे यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित पोहोचून धामण सापाला सुरक्षित पकडले व त्यालाही जंगलात मोकळे करून दिले.
श्रावण महिन्यात आतापर्यंत अनिल साखरे यांनी सहा वेगवेगळ्या सापांच्या प्रजातींना जीवदान दिले असून, त्यांच्या या सामाजिक कार्याची पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. सापांविषयी अंधश्रद्धा आणि भीती दूर करत त्यांनी निसर्ग संवर्धन आणि प्राणीमात्रांबद्दल करुणा व आपुलकीचा संदेश दिला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या या कार्याचे भरभरून कौतुक करत, अशा सर्पमित्रांनी जनजागृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन केले आहे.
