सह्याद्री माझा न्युज प्रतिनिधी पंढरीनाथ पाटील
वाशिम तालुका:
वाशिम तालुक्यातील बिटोडा तेली गावाकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या चार-पाच वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. पार्डी टकमोर फाट्यावरून जाणारा हा रस्ता गावकरी व विद्यार्थ्यांसाठी जीवनरेषा ठरत असला, तरी आज तो खड्ड्यांनी भरलेला व धोकादायक झाला आहे.
गावातील मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे पावसाळ्यात पाण्याने भरून चिखलमय होतात. परिणामी वाहनचालकांना तर त्रास होतोच, पण पायी चालणे किंवा सायकलने प्रवास करणेही कठीण झाले आहे.
विद्यार्थ्यांचे हाल
दररोज तीन ते चार गावातील विद्यार्थी या रस्त्याने शाळेत जातात. मात्र खड्डे आणि पाण्यामुळे वारंवार अपघात होत असून, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना हॉस्पिटलचा रस्ता धरावा लागतो.
ग्रामस्थांचा आक्रोश
गावकरी प्रशांत भागवत थोरात यांनी सांगितले –
“गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरवस्थेत आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा मागण्या करूनही प्रशासन लक्ष देत नाही. जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, ही आमची हात जोडून विनंती आहे.”
आंदोलनाची चिन्हे
बिटोडा तेली गावाकडे जाणारा हा रस्ता ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत.
