सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी
दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावात लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने करण्यात आले. या कार्यक्रमात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला, तसेच विविध मान्यवर उपस्थित राहून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि त्यांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला गेला.
या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, थिलोरीच्या सरपंच मीनाताई धर्माळे, शशांक भाऊ धर्माळे, नितेश वानखडे, संगीताबाई चौरपगार, संजय वाकपांजर, सचिव चारथळ, बाळकृष्ण वाकपांजर, रवी भाऊ वाकपांजर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष अक्षय भालेराव, प्रमोद रामचंद्र भालेराव, सचिव चेतन वाडी, तसेच समितीचे अन्य सदस्य व गावातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती सांगून, त्यांच्या साहित्य, क्रांतिकारी विचार व समाजासाठी केलेल्या योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात समता, शिक्षण आणि स्वाभिमान वाढवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती, थिलोरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमात गावकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आदरपूर्वक सहभाग घेतला.
थिलोरी गावाने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले असून, त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
