सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी
देशभरात वापरली जाणारी डिजिटल पेमेंट सेवा म्हणजेच UPI (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) वर आजपासून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जर तुम्ही सतत एकाच व्यक्तीला पैसे पाठवत असाल, तर या व्यवहारांवर आता अधिक बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांनी फ्रॉड नियंत्रण आणि सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी हे बदल केले आहेत.
नव्या नियमानुसार, जर एकाच UPI आयडीवर वारंवार पैसे पाठवले गेले, तर त्या व्यवहारांची माहिती ‘हाय रिस्क’ श्रेणीत वर्ग केली जाईल. याचा उद्देश फसवणुकीचे प्रकार रोखणे हा आहे. याशिवाय, अज्ञात किंवा नवीन जोडलेल्या UPI आयडीवर पैसे पाठवण्याआधी 4 तासांची ‘कूलिंग पिरियड’ देखील बंधनकारक करण्यात आली आहे.
UPI व्यवहार करताना आता हे महत्त्वाचे बदल जाणून घ्या:
- वारंवार व्यवहार तपासणी: एका दिवशी एका व्यक्तीसाठी सतत व्यवहार झाल्यास, बँक/UPI ॲप तात्पुरते व्यवहार थांबवू शकते.
- कूलिंग पिरियड: नवीन UPI आयडी किंवा पेमेंट रिसिपियंट जोडल्यास लगेच पैसे पाठवता येणार नाहीत; 4 तासांची प्रतीक्षा आवश्यक.
- बिझनेस व्यवहारांसाठी वेगळे नियम: व्यवसायिक व्यवहार करणाऱ्यांसाठी वेगळ्या पॉलिसी लागू करण्यात आल्या आहेत.
- संदिग्ध व्यवहारांवर नियंत्रण: UPI ॲप मध्ये अल्गोरिदमद्वारे संशयास्पद व्यवहार हायलाईट केले जातील आणि कधी कधी ओटीपी आवश्यक केला जाईल.
सध्या देशभरात दररोज ४० कोटीहून अधिक UPI व्यवहार होत असल्याने, NPCI ने यंत्रणा अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी हे बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
जर तुम्ही गूगल पे, फोनपे, पेटीएम, भीम ॲप वापरत असाल, तर तुम्हाला हे बदल तात्काळ लागू होतील. हे नियम सर्व बँका आणि UPI सेवा देणाऱ्या ॲप्स वर लागू करण्यात आले आहेत.
हा बदल सामान्य वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी असून, त्याचा उद्देश कोणावर बंधन आणण्याचा नसून, UPI व्यवहार अधिक सुरक्षित बनवण्याचा आहे. त्यामुळे सतत व्यवहार करणाऱ्यांनी सावध राहावे व गरज नसल्यास व्यवहार टाळावेत.
