सह्याद्री माझा न्युज l प्रतिनिधी

दर्यापूर तालुक्यातील काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीची चाहूल लागली असतानाही काँग्रेसकडे ठोस रणनीती किंवा नियोजन नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांमध्येही काँग्रेसबद्दल उदासीनता जाणवू लागली आहे.
दर्यापूरचे खासदार काँग्रेसचे असूनही त्यांनी तालुक्याच्या प्रश्नांकडे पाठ फिरवल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. स्थानिक समस्या सोडवण्यात अपयश, संघटना मजबूत करण्याकडे उदासीनता आणि कार्यकर्त्यांशी संवादाचा अभाव यामुळे खासदारांविषयी नाराजी वाढली आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देखील “काय करू, काय नाही करू” अशा गोंधळलेल्या स्थितीत अडकले आहेत. उमेदवार ठरवण्यात झालेला उशीर, गटबाजीवर नियंत्रण न मिळवणे आणि कार्यकर्त्यांना संघटित करण्यात आलेलं अपयश यामुळे तालुका पातळीवर पक्षाची पकड ढासळली आहे.
“वरिष्ठांकडून मार्गदर्शन नाही”, “जमिनीवरील प्रश्नांवर चर्चा होत नाही”, “शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करून कार्यकर्त्यांना फसवलं जातं”, अशा शब्दांत कार्यकर्त्यांचा असंतोष आता उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे.
भाजपसह इतर पक्ष पूर्ण तयारीत असून कार्यकर्त्यांपासून ते मतदारांपर्यंत संघटनात्मक बळकटी साधत आहेत. मात्र काँग्रेसमध्ये अव्यवस्था, असंघटितपणा आणि नेतृत्वाचा गोंधळ कायम असल्याने दर्यापूर तालुक्यात पक्षाची स्थिती अधिकच धोकादायक होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.