
दर्यापूर (प्रतिनिधी) – समाजात सलोखा, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कृषी भवन, दर्यापूर येथे उत्साहात पार पडला. विविध धर्मीय वधू-वरांनी एकाच मंचावर विवाहबद्ध होत सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला.
हा कार्यक्रम समाज कल्याण विभाग, अमरावती, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, अमरावती आणि मणिषा ज्ञानप्रकाश बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. संजय चोरपगार (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, अमरावती) हे होते, तर उद्घाटन कमलजीत कौर मॅडम (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या हस्ते संपन्न झाले.
विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांचे विधी पारंपरिक पद्धतीने, अत्यंत साधेपणाने पार पडले. विवाहानंतर वधू-वरांना उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक संस्था उपस्थित राहिल्या.

अमर्दीप सदाशिव, राहुल तायडे, नरेंद्र डोंगरे व संदेश कुळखे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भरभरून कौतुक केले असून, समाजात सलोख्याचा आदर्श निर्माण करणारा हा सोहळा ठरला.