बिलोली : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय सध्या खाजगी इमारतीत कार्यरत असून, यामुळे कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी आणि कृषी सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीतील त्रुटी लक्षात घेता, या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत आणि आवश्यक सुविधांसाठी निधीची तातडीने आवश्यकता आहे. आ. जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली आहे. आ. अंतापूरकर यांनी दिलेल्या कृषीमंत्र्यांना निवेदनात कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांना तात्काळ सेवा पुरवण्यासाठी एक सक्षम आणि सुसज्ज कृषी कार्यालय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याची खाजगी जागा अपुरी असल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सेवांवर होत आहे.
त्यांनी मागणी केली आहे की, बिलोली तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत, आधुनिक कार्यालयीन सुविधा, आवश्यक उपकरणे, फर्निचर आणि इतर शासकीय सुविधांचा समावेश असलेल्या निधीची तरतूद करावी. याशिवाय, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे.
